बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य कॅबिनेट मंत्री; पण दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक नाही! निलेश राणेंची टीका

मुंबई : आभाळाएवढे व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काल १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ”बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, “शिष्य” एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही..” असे म्हणत निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका हुबेहूब साकारल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा १३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा सिनेमा प्रदर्शित झाल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. दुसरीकडे भाजप नेते निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही; पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला; पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही’, अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्मावर बोट ठेवले आहे.

Share