अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी ‘मातोश्री’बाहेर ‘हनुमान चालिसा’ पठण करण्याची घोषणा करुन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या दोघांनी यासाठी मुंबईत डेरा टाकल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात हल्लकल्लोळ माजवणाऱ्या खासदार नवनीत राणा आपल्या मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्या आपल्या मतदार संघाचे प्रश्न नेहमीच लोकसभेत मांडताना दिसतात. राजकारणात येण्यापूर्वी नवनीत यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांत अभिनेत्री म्हणून काम केले.
नवनीत कौर यांनी अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी एका सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते. २फेब्रुवारी २०११रोजीच्या या सोहळ्यात एकूण ३१६२जोडप्यांचे लग्न झाले होते. त्यात २४४३हिंदू, ७३९, बौद्ध, १५०मुस्लिम, १५ख्रिश्चन व १३ अंध जोडप्यांचा समावेश होता. आमदाराचे लग्न असल्यामुळे या सोहळ्यात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी सहभाग घेतला होता. त्यात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरु बाबा रामदेव, सहाराश्री सुब्रत रॉय व अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा समावेश होता.
तेलुगु चित्रपटांतून कारकिर्दीस सुरूवात
नवनीत कौर यांचा जन्म ३जानेवारी १९८६रोजी मुंबईत झाला. त्यांनी बहुतांश तेलुगु चित्रपटांत काम केले. त्यांचे आई-वडील पंजाबी होते. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते. १२वी पास झाल्यानंतर नवनीत यांनी शिक्षण सोडून एक मॉडल म्हणून काम सुरू केले. त्यावेळी त्यांनी ६ म्यूझिक अल्बममध्ये काम केले.