राणा दाम्पत्यास अटक; आजची रात्र पोलिस ठाण्यात!

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दंड थोपटून त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा निर्धार करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली आली आहे. कलम १५३ (अ) अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली असून, या दाम्पत्याची आजची रात्र पोलिस ठाण्यातच जाणार आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि भोंग्यांच्या प्रकरणावरून वातावरण तापले आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे ‘मातोश्री’ समोर हनुमान चालिसा पठणावर ठाम होते. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. रात्रभर शिवसैनिकांनी ‘मातोश्री’समोर पहारा दिला, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार येथील घराला घेराव घालून त्यांचा रस्ता अडवून धरला होता.
आज शनिवारी सकाळपासून मुंबईत सुरू असलेल्या शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्याच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कडक पोलिस बंदोबस्तात राणा दाम्पत्यास घराबाहेर काढून या दोघांनाही खार येथील पोलिस ठाण्यात नेण्यात आले. आ. रवी राणा बाहेर येताच घरासमोर जमलेल्या जमावातील एकाने त्यांच्यावर पाण्याची बाटली भिरकावली. घराबाहेर आल्यानंतर राणा दाम्पत्याने ‘जय श्रीराम’चा जयघोष केला, तर शिवसैकांनीही आक्रमक होत प्रतिआव्हान दिले. साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रचंड मोठ्या पोलिस बंदोबस्तात राणा दाम्पत्यास घेऊन पोलिस खार पोलिस स्टेशनकडे रवाना झाले. यावेळी राणांच्या गाडीपाठीमागे काही शिवसैनिक धावून गेले; पण पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्याने राणा दाम्पत्य सुखरूप पोलिस स्टेशनला गेले. यानंतर पोलिसांनी कलम १५३ (अ, ब) अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करीत त्यांना अटक केली. यावेळी शिवसैनिकांनी पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह नाव माहिती नसलेल्या शिवसैनिकांविरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ठाकरे आणि राऊत यांनी शिवसैनिकांना चिथावणी दिली असून, आपल्या जीवाला धोका असल्याचे राणा दाम्पत्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्‍यान, शिवसैनिकांनी शांतता बाळगावी, आंदोलन मागे घ्‍यावे, असे आवाहन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना केले आहे.

Share