उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा – पीयूष गोयल

मुंबई : उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत, आता केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून काम केल्यास खऱ्या अर्थाने भारताचा कायापालट होऊ शकतो. महाराष्ट्र हे देशातील सर्वात औद्योगिक, प्रगतीशील आणि वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यामुळे सध्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचे शिखर गाठेल’, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी व्यक्त केला. मुंबई येथे चौथी एनआयसीडीसी गुंतवणूकदार गोलमेज परिषद  आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र औद्योगिक टाऊनशिप लिमिटेडने या परिषदेचे आयोजन केले आहे. नामवंत गुंतवणूकदारांव्यतिरिक्त,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, विविध देशांचे वाणिज्य दूत आणि महाराष्ट्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री पीयुष गोयल पुढे म्हणाले की, ‘पायाभूत सुविधांच्या निर्मीतीचे महत्त्व जगाने ओळखले आहे. यामुळे  उद्योग वाढीसह अर्थव्यवस्थेला चालना तर मिळतेच, त्याचबरोबर अनेक नव्या संधी निर्माण होतात.  राज्यात  मेट्रो, ट्रान्स हार्बर, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग यासारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. लॉजिस्टीक्सचा खर्च कमी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे’.

तंत्रज्ञानाचा वापर करुन उद्योजकांसाठी देशात अनेक सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत. एक खिडकी योजनेच्या माध्यमातून परवानगी देण्याची सेवा ही सध्या प्रायोगिक तत्वावर सुरु आहे. यात काही सुधारणा करण्यासाठी सूचना आमंत्रित असल्याचेही केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले.

‘सन २०४७ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ३० ट्रिलीयन डॉलर एवढी होईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘महिला उद्योजक, स्टार्टअप यांचा देशातील वाढत्या उद्योजकतेत महत्वाचा सहभाग आहे. जगाचे ग्रोथ इंजिन म्हणून आपला देश काम करत आहे’, असेही केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले.

गुंतवणुकीसाठी पुढे यावे – फडणवीस

केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यात उद्योगवाढीसाठी उत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. जास्तीत- जास्त गुंतवणुकदारांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी केले. उद्योजकांसाठी प्रोत्साहनांचे पॅकेज तयार आहे. उद्योगाच्या विशेष गरजा देखील पूर्ण केल्या जात आहेत. औरंगाबाद येथे ओरिक सिटी मध्ये एक उत्तम परिसंस्था तयार केली आहे. याठिकाणी ‘प्लग’ आणि ‘प्ले’ यासाख्या सुविधा तयार आहेत. इथे मिळालेली जागा अपुरी पडेल असा प्रतिसाद याठिकाणी मिळतो आहे

Share