भरधाव कारची दुचाकीला धडक; पत्नी जागीच ठार

हिंगोली : हिंगोली ते कन्हेरगाव नाका मार्गावर बासंबा पाटीजवळ भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. उषाबाई मधुकर कामखेडे (वय ५० वर्षे, रा. ढोलउमरी, ता. हिंगोली) असे मयत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील ढोलउमरी येथील मधुकर भिवाजी कामखेडे आणि त्यांची पत्नी उषाबाई मधुकर कामखेडे हे दोघे जण त्यांच्या दुचाकी वाहनावर शनिवारी (२८ मे) रात्री पिंपळखुटा येथे पाहुण्यांना भेटण्यासाठी जात होते. त्यांची दुचाकी हिंगोली ते कन्हेरगाव मार्गावर बासंबा पाटीजवळ आली असताना हिंगोलीकडून कन्हेरगावकडे सुसाट वेगाने जाणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या उषाबाई कामखेडे (वय ५० वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती दुचाकीचालक मधुकर कामखेडे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पिंपळखुटा येथील गावकरी संतोष चिवडे, शंकर खंदारे, शिवराम खंदारे यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार, जमादार प्रवीण राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली.

शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मयत उषाबाई कामखेडे यांचा मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. तसेच जखमी मधुकर कामखेडे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केले. मात्र, त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. या अपघातानंतर कारचालकाने कारसह घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणात बासंबा पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

 

Share