काही किडक्या डोक्याच्या लोकांनी शाहू महाराजांना स्क्रिप्ट बनवून चुकीची माहिती दिली :  फडणवीस

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे सध्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून छत्रपती शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली आहे. अशी माहिती देऊन ते संभाजीराजेंना खोटे ठरवत आहेत आणि दोघात अंतर असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याचे जाहीर करून सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेने आपल्या अपक्ष उमेदवारील समर्थन द्यावे, अशी विनंती संभाजीराजेंनी केली होती; पण संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा तरच शिवसेना त्यांना पाठिंबा देईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. संभाजीराजेंनी ही अट धुडकावल्यानंतर शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिल्याने संभाजीराजेंच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

शिवसेनेने संभाजीराजेंची फसवणूक करून छत्रपती घराण्याचा अपमान केला, असा आरोप सातत्याने शिवसेनेवर होत होता. त्यातच संभाजीराजेंचे वडील श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी स्वतःच हा आरोप खोडून काढत यासंदर्भात शनिवारी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे आता संभाजीराजे आणि शाहू महाराज यांच्यातच मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत खुलासा केला असला तर यावरून चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत. त्यामुळे त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले असले तरी त्या संदर्भात मी बोलणार नाही. त्या संदर्भात संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टपणे ट्विट करून सांगितले आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो, मी जे बोललो ते सत्य बोललो. मला असे वाटते की, त्यांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचे दुःख आहे की, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी शाहू महाराजांना स्क्रिप्ट तयार करून चुकीची माहिती दिली आहे. त्या लोकांना समजत नाही की, अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटे ठरवत आहेत. दुसरीकडे शाहू महाराज आणि संभाजीराजेंमध्ये काहीतरी अंतर आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे काम करणाऱ्यांबद्दल मला प्रचंड दुःख आहे, असे फडणवीस म्हणाले.

युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत होते आणि सध्याही होत आहे. मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर त्याचा कुठलेही नुकसान भाजपला नाही. त्याचे नुकसान कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून संभाजीराजे यांचे नेतृत्व तयार होऊ नये या प्रकारचे प्रयत्न कोण करणार हे ज्याला कोणाला राजकारण कळते त्याला समजू शकते, असेही फडणवीस म्हणाले.

भाजपकडून संभाजीराजेंना उमेदवारी देण्याबद्दल फडणवीस म्हणाले, मला संभाजीराजे छत्रपती भेटले होते त्यापूर्वीच त्यांनी मी कुठल्याही पक्षाचे तिकीट न घेता स्वतंत्र निवडणुकीला उभा राहणार असल्याची घोषणा केली होती. माझी अपेक्षा आहे की, छत्रपती घराण्याची परंपरा पाहता मागच्या वेळी भाजपने मला समर्थन देऊन राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा नियुक्त खासदार केले. यावेळी सगळ्या पक्षांनी मिळून अपक्ष म्हणून मला समर्थन दिले पाहिजे. मी कोणत्याही पक्षाचे तिकीट घेणार नसल्याचे मला संभाजीराजेंनी सांगितले होते. त्यावर सगळे पाठिंबा देत असतील तर मीही हायकमांडशी चर्चा करीन. कारण माझ्या हातात हे निर्णय नाहीत, असे मी संभाजीराजेंना सांगितले होते. काही लोक ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते नक्कीच उघडे पडतील, असे फडणवीस म्हणाले.

Share