मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार हे ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. तशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
जयंत पाटील आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने घेतला आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. @NCPspeaks @PawarSpeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 11, 2022
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू असे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले आहे.
दरम्यान ओबीसी आरक्षणाशिवाय येणाऱ्या निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ नये अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी अगोदरच जाहीर केले आहे.