शिंदे सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर १० हजार कोटींचा बोझा पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आजच्या बैठकीत शासनाने काही लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. आमचं सरकार हे सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारे आहे. आगामी काळातही आमही समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करु. त्याची सुरुवात आम्ही मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत केली आहे. आज आम्ही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने ४ नोव्हेंबर २०२१ आणि २२ मे २०२२ अशा दोन वेळेला इंधनावरील कर कमी केला होता. राज्य सरकारनेही कर कमी करावा, असे केंद्राने म्हटले होते. मात्र, महाराष्ट्राने इंधनावरील दरात कपात केली नव्हती. मात्र, आम्ही केंद्र सरकारची ही सूचना मान्य करून पेट्रोल आणि डिझेलवरील करामध्ये कपात करत आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी.

राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.

केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० राज्यात राबवणार.

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.

बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.

आणीबाणीच्या काळात ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान करण्याची योजना पुन्हा सुरु करणार.

Share