इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

मुंबईः  इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलली आहे. २० जुलै रोजी राज्यभरात ही परीक्षा होणार होती. मात्र अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी ची परिस्थिती निर्माण झाल्याने आणि मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायला अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा आता ३१जुलै रोजी राज्यभर घेतली जाणार आहे.

 

राज्यात गेल्या काही दिवसांन पासून जोरदार पावसानी हजेरी लावली आहे. तसेच मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने येत्या ४८ तासांत राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा देखील पावसामुळे बंद आहेत. २० जुलै रोजी घेण्यात याणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता ३१ जुलैला घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. राज्यभरातून इयत्ता पाचवीचे ४,१०,३९५ आठवीचे २,९९,२५५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं दिलेल्या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे की, राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती आणि भूस्खलनाच्या घटनांमुळं अनेक ठिकाणी वाहतूक बंद आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शिष्यवृती परीक्षा २० जुलै ऐवजी ३१ जुलै रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Share