केंद्राच्या नोटबंदी धोरणात मोठी चूक, धोरण कुठे चुकलं हे केंद्रानं स्पष्ट करावं : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या धोरणामध्ये मोठी चूक झाली असून हे कशामुळे घडले व धोरण कुठे फसले ही भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट करावी,अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. आज राष्ट्रवादी जनता दरबार उपक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“नोटाबंदीचे धोरण भारतीय अर्थव्यवस्थेला अडचण निर्माण करणारे आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचा हा पराभव आहे. हे कशामुळे घडलं व पुढे नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने काय उपाययोजना केली हे केंद्र सरकारने संपूर्ण चौकशी करून जनतेला माहिती द्यावी,” अशी मागणीही दिलीप वळसे पाटील यांनी केली.

हनुमानाचा जन्म हा वाद अनावश्यक

“हनुमानाचा जन्म अंजनेरीला झाला की किश्कंदला झाला हा वाद अनावश्यक आहे याला फार महत्त्व देऊ नका,” अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुनावले आहे. दरम्यान महागाई, बेरोजगारी, टंचाई यासारखे अनेक प्रश्न देशासमोर आहेत याकडे लक्ष द्या असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. आज सगळे ठरवून चालले आहे. जे विषय देशासमोर नाहीत ते विषय काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राम जन्म आणि हनुमान जन्म कुठे झाला. हा विषय आजचा नसल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री बदलाची चर्चा नाही
मुख्यमंत्री बदलाबाबत कोणतीही चर्चा महाविकास आघाडीमध्ये नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे पाच वर्षाकरीताचे पूर्ण काळ मुख्यमंत्री म्हणून राहतील. याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील याबाबत सातत्याने महाविकास आघाडीने सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाबाबतचा कोणता प्रश्नच उद्भवत नाही. असही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं
Share