‘कॉंग्रेस पाठिंबा काढणार आणि ठाकरे सरकार पडणार’; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

औरंगाबाद : राज्यसभेच्या निवडणूकांमुळे राज्यात सध्या वातावरण तापलेल आहे. शिवसेना आणि भाजपने राज्यसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने बाहेरचा उमेदवार दिल्याने नाराजी आहे. दरम्यान कॉंग्रेस पक्षात काही अलबेल नाही. त्यामुळे कॉंग्रेस महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेईल आणि हे सरकार पडेल. असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. . त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षात सर्वकाही अलेबल नसल्याच चित्र सध्या दिसत आहे. कॉंग्रेसमध्ये सत्तेतून बाहेर पडण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. इतकंच नव्हे तर काँग्रेसने पाठिंबा काढला तर अडीच वर्षांसाठी आम्ही सत्ता बनवणार असल्याचेही आठवलेंनी स्पष्ट केलं आहे.  आम्ही शिवसेनेला अडीच वर्षाचा फॉर्म्युला दिला होता, पण त्यांनी आम्हाला धोका दिला, असा आरोपही आठवलेंनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, भाजपचा उमेदवार निवडून येणार असल्याने आम्हाला घोडेबाजार करण्याची गरजच नाही. राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निवडणुकीत भाजपचाच विजय होणार आहे. भाजपकडे विजयासाठी लागणारे संख्याबळही आहे. सातवा उमेदवार आधी त्यांनी टाकला, आम्ही नाही. मग आम्हालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.  महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असल्याने तेही आम्हाला मतदान करु शकतात आणि सर्व अपक्ष आमदारही आमच्यासोबत आहे, असा विश्वासही आठवलेंनी यावेळी व्यक्त केला आहे.

Share