संजय राऊतांना मोठा धक्का; मुख्यमंत्री शिंदेंनी जामीनदारच फोडला

मुंबई : ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. काल नागपूरमध्ये  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब चौधरी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे  पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगात असतांना त्यांना जामीन मिळवण्यासाठी संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत आणि भाऊसाहेब चौधरी यांनी सह्या केल्या आहेत. भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊत यांचे जामीनदार आहे. एकूणच संजय राऊत यांचे जामीनदार असलेले भाऊसाहेब चौधरीच शिंदे गटात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षांच्या कालखंडात नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची अपेक्षित असलेली कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. मात्र राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यावर मात्र गेल्या पाच महिन्यात अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले गेले या निर्णयामुळे प्रभावित झाल्यामुळेच आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार झालो असल्याचे मत भाऊसाहेब चौधरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, ठाणे जिल्हाप्रमुख आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे,कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हे देखील उपस्थित होते.

Share