नवीन अभ्यासक्रमात महापुरुषांची चरित्रे; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणे : शाळेतील मुलांना छत्रपती शिवाजी महाराज अवगत व्हावेत, त्यांचे कर्तृत्व समजावे यासाठी नवीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे समाविष्ठ करण्याचा निर्णय घेऊ, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ३५६ व्या आग्य्राहून सुटका स्मृतिदिनानिमित्त किल्ले राजगड उत्सवांतर्गत लाल महाल येथून लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळ्याने किल्ले राजगडसाठी प्रस्थान ठेवले. त्या कार्यक्रमात पाटील यांनी पालखीचे पूजन केले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की,नवीन अभ्यासक्रमात ७० टक्के व्यवसाय नोकरीसाठी ३० टक्के महापुरुषांची चरित्रे, योगा, कला इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य  कळण्यासाठी १०० गुणांचा पेपर  ठेवण्यात येईल.

छत्रपतींच्या काळातील विहिरी व तटबंदी अजूनही शाबूत असून त्या काळातील बांधकाम किती चांगले होते ते कळते. आग्र्याला ते जेव्हा अटकेमध्ये होते त्यावेळी स्वराज्यावर आर्थिक संकट आले होते.त्यावेळी त्यांनी तेथील सावकारांकडून अष्टप्रधानांकडे पैसे पुरविले होते. ते त्यांनी सुटकेनंतर व्याजासह परत केले. शिवाजी महाराज एक खरे आर्थिकतज्ञ आणि व्यवहारात चाणाक्ष होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटकेचा स्मृती सोहळा श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ हे सातत्याने ४२ वर्षापासून करीत आहे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Share