माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर येतोय ‘बायोपिक’

मुंबई : बाॅलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा सीझन सुरू आहे. अनेक दिग्गज व्यक्तींवर चित्रपट येत आहेत. आता भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतीय पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर बायोपिक येत आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे नाव आहे ‘अटल’. हा सिनेमा अटल बिहारी वाजपेयी यांच्या आत्मचरित्रावर आधारित आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. ‘मैं रहूं या ना रहूं, ये देश रहना चाहिए-अटल’ अशी टॅगलाईन त्याला देण्यात आली आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित करण्यात आलेल्या या मोशन पोस्टरला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणातील काही ओळी उदधृत करण्यात आल्या आहेत. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान म्हणून अटल बिहारी यांना ओळखले जायचे. त्यांचा करारी बाणा, आत्मविश्वास आणि संयमीपणा हा नेहमीच इतरांसाठी आदर्श होता. अटल बिहारी वाजपेयी हे साहित्यिक होते. कवी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू ‘अटल’ नावाच्या बायोपिकमधून पाहायला मिळणार आहेत.

https://www.instagram.com/p/CfV_x3cJcpp/?utm_source=ig_web_copy_link

या चित्रपटाचे निर्माते आहेत विनोद भानुशाली आणि सुशांतसिंह राजपूत खटल्यामुळे चर्चेत आलेले संदीप सिंह. अद्याप या चित्रपटातील कलाकारांच्या नावाची घोषणा झालेली नाही. या सिनेमाचे शूटिंग २०२३ मध्ये सुरू होईल आणि हा चित्रपट अटलजींच्या ९९ व्या जयंतीला प्रदर्शित होईल. २५ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्या जन्मदिनी हा सिनेमा थिएटरमध्ये पाहता येईल, अशी माहिती समोर आली आहे.

या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी हे देशातील दिग्गज नेत्यांपैकी एक. ते आपल्या शब्दांनीही विरोधकांचे मन जिंकायचे. त्यांनी प्रगतीशील भारताचा पाया रचला होता. मला सिनेनिर्माता म्हणून नेहमीच वाटते की, अशा लोकांच्या माहीत नसलेल्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचायलाच हव्यात. सगळ्यांना त्या माहीत व्हायला हव्यात. या सिनेमात फक्त अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय दृष्टिकोनच दाखवला जाणार नाही, तर एक कवी, माणूस म्हणून ते किती महान होते, हे समोर आणायचे आहे. ते सगळ्यांचे आवडते विरोधी पक्ष नेता आणि नंतर पंतप्रधान होते.’

”मी राहो अथवा न राहो, मात्र हा देश राहिला पाहिजे. त्यानं मोठी झेप घेतली पाहिजे. त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष करण्यासाठी मी तयार आहे,” असे वक्तव्य करणाऱ्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनसंघर्ष हा खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांचे राजकीय कौशल्य, त्यांचे कवित्व आणि सगळ्यात महत्वाचे त्यांचे वक्तृत्व हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांचे वक्तृत्व अफलातून होते. अटल बिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले. आजही त्यांचे राजकीय विचार हे अनेकांना प्रेरणा देतात. अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर येणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना आतापासूनच उत्सुकता आहे.

Share