सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी जामीन अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. पण आज त्यांनी हा अर्ज मागे घेतला.
नितेश राणे यांची कोर्टात बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. “नितेश राणे यांचा जामीन अर्ज हायकोर्टासमोरील निवेदनासह मागे घेतला आहे. नितेश यांना चौकशीला सामोरे जायचे असल्याने सुप्रीम कोर्टाकडून आणखी ५ दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही ते तपास अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करत आहेत”, अशी प्रतिक्रिया वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.
नेमक प्रकरण काय?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीदरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला होता. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी आपल्यावर शस्त्राने हल्ला केल्याचा दावा संतोष परब यांनी केला आहे. या हल्लामागे भाजप आमदार नितेश राणे असल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. संतोष परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आहेत.