मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील उभारलेल्या ‘छाबय्या विहंग गार्डन’ या गृहसंकुलातील अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड व त्यावरील व्याज वित्त विभागाचा विरोध डावलून माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. दरम्यान या निर्णयावरुन भाजपाने ठाकरे सरकारव निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांसाठी पैसे नाही पण आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी अशा शब्दांत पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.
केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही कबूल करूनही प्रोत्साहन भत्ता देत नाही. शेतकऱ्यांसाठी पैसे नसतात पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी करता. वा रे ठाकरे सरकार.
https://twitter.com/keshavupadhye/status/1481483923108544512?s=20
केशव उपाध्ये यांनी यावेळी एसटी कामगार आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दाही उपस्थित केला आहे. एसटी कामगारांनी तडफडून आत्महत्या केल्या पण तुम्हाला पाझर फुटला नाही. अतिवृष्टी,अवकाळी पाऊस,गारपिटीत सापडलेल्या शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही.पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालायला सरकारी तिजोरीचे कोट्यवधींचे नुकसान. वा रे ठाकरे सरकार, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.