मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसूली संचालनालय अर्थात ईडीने अटक केली. या अटकेमुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. अटकेमुळे केंद्रातील भाजप सरकार हे तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची प्रतिक्रिया राज्य सरकारच्या मंत्र्यांकडून दिली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप नेत्यांकडून या अटकेचं मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जात आहे. मुंबई भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी हवेत तलवारबाजी करत जल्लोष साजरा केला. कंबोज यांनी आपल्या समर्थकांसोबत स्वत:च्या घराबाहेर फटाके फोडून मलिक यांना अटक झाल्याबद्दल सेलिब्रेशन केलं. मात्र या सेलिब्रेशनमधील एक चूक त्यांना महागात पडली असून त्या प्रकरणी त्यांच्याविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आलाय.
यावेळी भाजपा समर्थकांनी पक्षाचे झेंडे फडकवत जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणाबाजी केली. यावेळी मोहित कंबोज यांनी म्यानातून तलवार काढून ती हवेत उचावत जल्लोष साजरा केला. मात्र उत्साहाच्या भरात केलेल्या या कृतीमुळे आता कंबोज अडचणीत आले आहेत. कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंबोज यांनी केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर सांताक्रुझ पोलीस स्थानकामध्ये कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना नियमांचं उल्लंघन करुन गर्दी जमल्याबद्दल आणि सार्वजनिक ठिकाणी तलवार नाचवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.