नवी दिल्ली: भाजप आणि शिवसेना यांचे वैर सर्वश्रृत आहे. पण, कधी-कधी या दोन्ही पक्षांचे नेते अशी काही वक्तव्ये करतात, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. अशाच प्रकारचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ‘भाजपचा नेहमीच विरोध करावा, असं नाही. त्यांच्या काही चांगल्या गोष्टी आम्ही घ्याव्यात, आमच्या चांगल्या गोष्टी त्यांनी घ्याव्यात’, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. संजय राऊत यांना पत्रकारांनी भाजपच्या जाहिरनाम्याविषयी प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले की, ‘आमचे भाजपसोबत नळावरचं भांडण नाही. भाजपच्या जाहीरनाम्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक गोष्टीला विरोध आम्ही करणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणतात, ‘आम्ही त्यांच्या काही चांगल्या गोष्टी घेतो, त्यांनी आमच्या काही चांगल्या गोष्टी घ्यावात. राज्यासाठी, राष्ट्रासाठी त्यांनी काही चांगली पावले उचलण्याचे मान्य केले असेल, तर नक्कीच त्यातल्या काही गोष्टी आम्हीसुद्धा घेऊ,’ असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.