बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; शाहरुख खान, कतरिना कैफला कोरोनाची लागण

मुंबई : देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. बॉलिवूडमध्येदेखील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या तब्बल ५५ बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता कार्तिक आर्यनपाठोपाठ बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री कतरिना कैफ यांचाही कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शाहरुख खानला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

https://www.instagram.com/p/Cea-ebivw3T/?utm_source=ig_web_copy_link

दिग्दर्शक करण जोहरचा २५ मे रोजी ५० वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील यशराज फिल्म स्टुडिओमध्ये जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. करणने आयोजित केलेल्या बर्थ डे पार्टीमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, विकी कौशल, ऋतिक रोशन, अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, अभिनेत्री कतरिना कैफ, ऐश्वर्या राय, करिना कपूर-खान, काजोल, राणी मुखर्जी, जुही चावला, कियारा अडवाणी, फराह खान, जान्हवी कपूर, पूजा हेगडे, सबा आझाद यांच्यासह बॉलिवूड तसेच टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित होते. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेल्या तब्बल ५५ स्टार कलाकार पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. करणच्या वाढदिवसाची ही जंगी पार्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत.

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत सहभागी झालेल्या आदित्य रॉय कपूर, कार्तिक आर्यन, कतरिना कैफ आणि शाहरुख खान या सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. १ जून रोजी कतरिना कैफ आणि ४ जूनला कार्तिक आर्यनचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये आता अभिनेता शाहरुख खान याचेदेखील नाव जोडले गेले आहे. शाहरुख खानलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती फिल्मफेअरने याविषयी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली आहे.

फिल्मफेअरने केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘शाहरुख खान कोरोना पॉझिटिव्ह. आम्ही अभिनेत्याला लवकरात लवकर बरे वाटावे अशी इच्छा व्यक्त करतो.’ फिल्मफेअरने केलेल्या पोस्टवर शाहरुखच्या चाहत्यांनी लगेचच कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. शाहरुख खानच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशा आशयाच्या कमेंट्स चाहते करत आहेत. करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खान रेड कार्पेटवर दिसला नव्हता. मात्र, या पार्टीच्या डान्स फ्लोअरवरील एक व्हिडीओ व्हायरल होता. ज्यामध्ये शाहरुख खान ‘कोई मिल गया’ या गाण्यावर डान्स करताना दिसला होता.

शाहरुख खानला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी ‘पठाण’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली होती. नुकताच शाहरुख खानने त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित केला होता. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

गेल्या वर्षीदेखील करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीमध्ये अभिनेत्री करिना कपूर-खान, मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा यांना कोरोना झाला होता. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाईचे आदेशही दिले होते. आता पुन्हा एकदा करण जोहरने त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. करण जोहरच्या या पार्टीनंतर त्याच्या जवळच्या बऱ्याच मित्रांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. बरेच जण कोरोना झाल्याचे सांगण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे.

Share