‘किरीट भावा, माझे गाळे असतील तर मला परत दे’; पेडणेकर

मुंबई :  भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका हडप केल्याचा आरोप केला होता. त्यावर आता किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युतर दिले आहे. किरीट सोमय्या यांनीच मला गाळे द्यावेत असा उपरोधिक टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. आयकर विभागाने आज सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला. या छाप्यानंतर शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाधव यांच्या निवासस्थान परिसरात भेट दिली. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, शिवसैनिकांना शांततेचे आवाहन करण्यासाठी मी याठिकाणी आले आहे. शिवसैनिकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यासाठी आले असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपची सत्ता नाही तिथे सर्वांना त्रास दिला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांना आम्ही घाबरून जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

काय म्हणाले होते किरीट सोमय्या?
किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, यशवंत जाधव बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून खूप मोठे रॅकेट चालवत होते. मी काल महाविकास आघाडीच्या डर्टी डझन नेत्यांची नावे जाहीर केली होती. त्यावेळी मी काही नावे विसरला होतो. यामध्ये आता यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांचा समावेश झाला आहे. किशोरी पेडणेकरांनी एसआरए सदनिका हडप केली असल्याचा आरोप केला.

 

काय म्हणाले किशोरी पेडणेकर?
२०२० मध्येही सोमय्यांनी माझे नाव घेतल होते. जसे श्रीकृष्णाने वस्त्रे देऊन द्रोपदीची पाठराखण केली. तसे मी भावाला सांगेन, किरीट सोमय्या भावा ८ गाळ्यांचा जो काही तुम्ही आरोप करत आहात, त्या गाळ्याबाबत मला काही माहीत नाही. पण माझा भाऊ बोलत असेल तर त्याने मला ते गाळे द्यावे. मी घ्यायला तयार आहे, असा चिमटा महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांना काढला आहे

Share