ताजमहाल आणि लाल किल्ल्याचे मंदिर बनवून दाखवा : मेहबूबा मुफ्ती यांचे भाजपला आव्हान

नवी दिल्ली : आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालबाबत सुरू झालेल्या वादात आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी उडी घेतली आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर ताजमहाल आणि लाल किल्ल्याचे मंदिर बनवून दाखवा. मग बघू किती लोकं हा देश बघण्यासाठी इथे येतात, असे आव्हान मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपला दिले आहे.

देशातील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणानंतर आता आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालबाबत वाद सुरू झाला आहे. भाजप नेते रजनीश यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ताजमहाल प्रत्यक्षात तेजो महाल असल्याचा दावा केल्याने वाद वाढत आहे. त्यांनी ताजमहालच्या तळघरातील २२ खोल्या उघडण्याची मागणी केली आहे. या वादात जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी उडी घेत भाजपला आव्हान दिले आहे.

“तुमच्यात हिम्मत असेल तर ताजमहाल आणि लाल किल्ल्याचे मंदिर बनवून दाखवा. मग बघू किती लोकं हा देश बघण्यासाठी इथे येतात, असे म्हणत लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच हा वाद निर्माण केला जात असल्याचा आरोपही मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. “मुघलांच्या काळात ताजमहाल, मशिदी, किल्ले बांधले गेलेत, त्या त्यांना खराब करायच्या आहेत. म्हणून त्यांच्या मागे पडून आहेत. यातून काहीच मिळणार नाही,” असेही त्या म्हणाल्या.

भाजप सरकारकडे जनतेला देण्यासारखे काहीच नाही, असा टोला मेहबूबा मुफ्ती यांनी लगावला आहे. बेरोजगारी, महागाई या सगळ्यात वाढ होत आहे. देशाची संपत्ती विकली जात आहे. आपला देश आता गरिबीच्या बाबतीत बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळच्या मागे पडला आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करणे आवश्यक आहे, खोऱ्यात सैन्य वाढवून काहीही होणार नाही, असे त्या म्हणाल्या.

काय आहे वाद?
इतिहासकार पीएन ओक यांच्या ‘ट्रू स्टोरी ऑफ ताज’ या पुस्तकावरून ताजमहालचा वाद सुरू झाला होता. या पुस्तकात ताजमहाल हे शिवमंदिर असल्याबाबत दावा करण्यात आला आहे. काही इतिहासकारांचा मते, ताजमहालमध्ये मुख्य समाधी आणि चमेलीच्या मजल्याखाली २२ खोल्या आहेत, ज्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यावर लोखंडी जाळी लावून ते बंद करण्यात आले आहेत. सुमारे ४५ वर्षांपूर्वीपर्यंत पायऱ्या उतरून जाण्याचा मार्ग खुला होता. या २२ खोल्या उघडण्यासाठी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Share