मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना सीबीआय न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पाटणकर यांच्याशी संबंधित ८४.६ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी कारवाई करण्यासाठी श्रीधर पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याने या प्रकरणाचा तपास थांबवण्याबाबतचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) सीबीआयने न्यायालयात सादर केला. हा अहवाल न्यायालयाने स्वीकारला असल्याने पाटणकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांचे भाऊ श्रीधर माधव पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि व्यवस्थापक आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात पुष्पक ग्रुपची एक कंपनी असलेल्या पुष्पक बुलियनच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिडेट कंपनीने खरेदी केलेल्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका ताब्यात घेतल्या होत्या. साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे. याआधी ईडीने पुष्पक बुलियन आणि ग्रुप ऑफ कंपनीजविरोधात ६ मार्च २०१७ रोजी आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच त्याआधी या ग्रुपच्या मालकीची २१ कोटी ४६ लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ईडीने या प्रकरणात पुष्पक बुलियन या कंपनीच्या चंद्रकांत पटेल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. मार्च महिन्यात ईडीने याच प्रकरणात श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीच्या ठाणे येथील नीलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका जप्त करून ६.५ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली होती.
श्रीधर पाटणकर यांच्यावर मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर सीबीआयकडूनही पाटणकर यांच्याविरोधात कारवाईचा फास आवळला जाण्याची शक्यता होती. मात्र, ईडीच्या विरोधानंतरही सीबीआय विशेष न्यायालयाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याने सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.
राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. भाजप नेत्यांच्या आरोपानंतर शिवसेनेच्या विविध नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात आली होती. हा कारवाईचा फास थेट ठाकरे कुटुंबातील व्यक्तींपर्यंतही पोहोचला होता. त्यातच थेट उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. शेल कंपन्यांच्या माध्यमातून हा घोटाळा झाला असल्याचे त्यांनी म्हटले होते. श्रीधर पाटणकर यांच्या ‘श्रीजी होम’ कंपनीत मनी लॉण्ड्रिंग करून पैसे वळवण्यात आले असून, यात २९ कोटी काळा पैसा गुंतवला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.