शरद पवार यांना दे धक्का; महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघाने ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आजीवन अध्यक्ष असून, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याची ही कारवाई शरद पवार व सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या ३० जून रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसात राज्य कुस्तीगीर परिषदेवर हंगामी समितीची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा संघटना आणि मल्लांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाल्याचे कळते. आजी आणि माजी मल्लांकडून गेल्या अनेक वर्षात तक्रारी केल्या जात आहेत. यावर्षीदेखील परिषदेविरोधात तक्रारी दिल्या गेल्या होत्या, अशी माहिती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी दिली.

भारतीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यामुळे शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण सिंह हे असून, त्यांचे शरद पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. तरीदेखील पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तासंघर्षात महाविकास आघाडीला सत्ता गमवावी लागली होती. त्यानंतर ही कारवाई झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपने दबाव तंत्राचा वापर करून ही कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरोधात अनेक तक्रारी
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा गेल्या ३० वर्षापासून कारभार पाहणारे सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे यांच्याविरोधात भारतीय कुस्तीगीर महासंघाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या एकहाती मनमानी कारभारामुळे अनेक जिल्हा संघटना व पदाधिकारी त्रस्त आहेत. एकाच जिल्ह्यात दोन संघटना चालवणे, त्यांच्यातील वाद न सोडवणे, खेळाडूंकडे दुर्लक्ष करणे, पदाधिकाऱ्यांना विचारात न घेणे आदी गोष्टींमुळे राज्यातील कुस्ती क्षेत्रात वाद सुरू आहेत, अशी तक्रारी त्यांच्याविरोधात करण्यात आल्या होत्या. तसेच राष्ट्रीय महासंघाच्या अनेक प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे कारण देत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आल्याचे भारतीय कुस्तीगीर महासंघाने म्हटले आहे.

असे सांगण्यात येते की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर  परिषदेच्या कारभाराबद्दल गेल्या काही वर्षापासून आजी-माजी मल्ल तक्रार करत होते. त्यात पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटना आघाडीवर होती. त्यांनी राज्य कुस्ती परिषदेच्या जमा-खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेने खर्चाची माहिती देण्याची मागणी केली होती; पण ती देण्यास टाळाटाळ केली गेली. गेल्या वर्षी झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत एका कंपनीचे प्रायोजकत्व स्वीकारले गेले. याबाबत अनेकांना शंका आणि प्रश्न होते. या कंपनीसोबत झालेला करारनामा लपवला गेल्याने नाराजी आणखी वाढली. या स्पर्धेसाठी परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी राज्य सरकारकडून ४३ लाख १८ हजाराचे अनुदान घेतले आणि याबाबत सभासदांना अंधारात ठेवले गेले.

परिषदेच्या कामकाजा बरोबर सचिव बाळासाहेब लांडगे यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी काम करणे, त्याचा मुलगा ललित लांडगे यांना कार्यालीन सचिव नियुक्त करणे यावर पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेने आक्षेप घेतला होता. तसेच संघटनेतील इतर कार्यकारणीवर आरोप केले जात होते. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेने लांडगे यांच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप घोडवे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तसेच नोटीस न देता पुणे जिल्हा आणि शहर राष्ट्रीय तालीम संघाची संलग्नता रद्द करण्यात आली. या प्रकरणी भारतीय महासंघाकडून आलेले आदेश परिषदेकडून डावलण्यात आले. वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळाने स्थगित झाल्याचे भासवणे, खोटे प्रोसिडिंग लिहून सर्व विषयांना खोटी मंजुरी दाखवणे, अशाही तक्रारी होत्या.

तक्रारदार संदीप भोंडवे काय म्हणाले?
दरम्यान, या कारवाईला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा आरोप पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केला आहे. परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही; पण सचिव बाळासाहेब लांडगे आणि त्यांच्या मुलाकडून भ्रष्टाचार सुरू आहे. याबाबत आम्ही चार दिवस उपोषण केले होते. तरीही लांडगे यांनी त्याची दखल घेतली नाही. पवारांनी पुणे संघटनेवर कारवाई करू नका, असे सांगितले असताना देखील लांडगे यांनी त्याला न जुमानता संलग्नता रद्द केली, असे तक्रारदार संदीप भोंडवे यांनी सांगितले.

Share