नागपूर : बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मित्रांसोबत सेलिब्रेशन करायला गेलेल्या एका तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यात माडगी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
काल (८ जून) बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. निकाल जाहीर झाल्यानंतर पास झालेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. अनेक विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षा पास झाल्याच्या निमित्ताने आपल्या मित्र-मैत्रिंणीसोबत सेलिब्रेशन केले. मात्र, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील माडगी येथे राहणाऱ्या निखिल महादेव बालगोटे (वय १७ वर्षे) या युवकाला बारावीच्या निकालाचा आनंदोत्सव साजरा करणे जीवावर बेतले.
बुधवारी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत निखिल बालगोटे याला ५७ टक्के गुण मिळाले होते. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी निखिल आपल्या तीन मित्रांसह माडगी येथील वैनगंगा नदी पात्राजवळ सेलिब्रेशन करायला गेला. त्याने मित्रांसह नदीत पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला. नदीत पोहता-पोहता तोल गेल्याने निखिल नदीपात्रात बुडाला. यावेळी त्याच्या दोन मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी नागरिकांना बोलावले. मात्र, तोपर्यंत निखिलचा मृतदेह नदीत वाहून गेला.
या घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत निखिलचा नदीपात्रात शोध सुरू केला. सुमारे एक ते दीड तासानंतर त्याचा मृतदेह आढळला. येथील तुमसर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. निखिलच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.