चंद्रकांत पाटलांनी चोंबडेपणा करू नये : संजय राऊत

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. यावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांतदादांनी चोंबडेपणा करू नये, हा शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपतींचा अंतर्गत विषय आहे, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, “प्रत्येक राजघराण्याचे काही राजकीय लागेबांधे आहेत, हे संबंधच घेऊन पुढं जावं लागतं. इथे व्यक्तिगत काहीच नसतं. चंद्रकांत दादा कोण? ते वंशज आहेत का शिवाजी महाराजांचे? ते कोण ठरवणारे? त्यांनी प्रथम २०१९ साली भाजपने आम्हाला दिलेला शब्द का मोडला, याचा खुलासा करावा. हा विषय छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे. इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करु नये. भाजपला इतकेच वाटत होते तर त्यांनी संभाजीराजे यांना ४२ मतं द्यायला पाहिजे होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या पक्षाने घेतलेल्या निर्णयाबाबत काही बोलू नये. ते आमच्या पक्षात येत आहेत का, असा सवाल राऊत यांनी विचारला.

चंद्रकात पाटील काय म्हणाले होते?
संभाजीराजे छत्रपतींनी काल पत्रकार परिषद घेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं म्हणत राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. ‘मुख्यमंत्र्यांना शिवरायांच्या पुतळ्यासमोर उभं करून खरंखोटं करावं’ असं म्हटलं होतं. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तिखट शब्दात टिका केली.

Share