सोमवारी (४ एप्रिल) ला सकाळी २२ वर्ष वयोगटातील एका अनोळखी तरूणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह ढोरवासा पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतशिवारात आढळून आला होता. पाच दिवसांनंतर या तरूणीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. २२ वर्षीय तरूणी ही नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील हाेती. स्थानिक गुन्हे शाखेने खून प्रकरणी एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिने दिलेल्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती उघडकीस आल्याचे पाेलिसांनी सांगितले.
अल्पवयीन मुलीने पाेलिसांना सांगितले की, खून करण्यात आलेल्या तरूणीसाेबत ती एकाच खोलीत भाड्याने राहत होती. एक दिवस दोघींमध्ये वैयक्तिक कारणांवरून भांडण झाले. त्यानंतर तरुणी ही संशयित आरोपी मुलीचा वारंवार अपमान करीत होती. याचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलीने तरूणीच्या हत्येचा कट रचला. याकरिता तिने एका मित्राची मदत घेतली.
अल्पवयीन मुलगी व तिच्या मित्राने तरुणीला ३ एप्रिल २०२२ राेजी रात्री ०८:४५ वाजता तरुणीला वरोरा नाका येथे बोलावून घेतले. यानंतर तिला एका निर्जनस्थळी नेले. अल्पवयीन मुलीने तरुणीला मारहाण करायला सुरुवात केली. तिच्यावर चाकूने वार केले. तिच्या मित्राने तरुणीच्या गळा आवळून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या मित्राने तरुणीचे शीर चाकूने धडावेगळे केले. मृतदेहावरील वस्त्र काढली. धडाला निर्जनस्थळी ठेवून शीर आणि कपडे घेऊन दोन्ही आरोपी मोटरसायकलने पसार झाल्याची कबुली अल्पवयीन मुलीने पाेलिसांसमाेर दिली आहे.
मृतदेह मिळाल्यानंतर तरुणीची पाच दिवसांनंतर ओळख पटली. पोलिसांनी मृत तरुणीच्या अल्पवयीन मैत्रिणीला ताब्यात घेतल्यानंतर खूनाचे गुढ उकलले. चंद्रपूर शहरातील दाताळा मार्गावरील रामसेतू पुलाखालील नदीत त्या तरुणीच शीर फेकून दिल्याची माहिती अल्पवयीन आरोपीने दिली. गोताखोरांच्या माध्यमातून शिर शोधण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर रामसेतू पुलाच्या खाली असलेल्या नदीत त्या तरुणीचे शिर आढळून आले.