चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; तर आशिष शेलार मुंबईच्या अध्यक्षपदी

मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आली आहे.  तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपने आक्रमक चेहऱ्याला बळ दिले आहे. विद्यमान भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचीही मंत्रिपदावर नियुक्ती झाल्याने आशिष शेलारांना अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांच्या नियुक्तीचे पत्र काढले आहे. राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या सहीने हे पत्र देण्यात आले. भाजपच्या श्रेष्ठींनी बावनकुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आणि बावनकुळे हेही नागपूरचेच. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपद हे एकाच शहरात दिले जाणार नाही असेही बोलले जात होते. तथापि, ओबीसी चेहरा म्हणून बावनकुळे यांना संधी देण्याचा विचार समोर आला.
कोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा मंत्रिपदाची धुरा होती. डिसेंबर २०१४ मध्ये नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी नागपुरातील कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २००४, २००९, २०१४ असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.
Share