वेरूळ जवळील महामार्गावर वाहतूक व्यवस्थेत बदल

औरंगाबाद : श्रावण महिन्यात वेरूळ जवळील महामार्गावर वाहनांची वाहतूक कोंडी निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आजपासून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

आजपासून ते श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तसेच २९ ऑगस्टच्या सकाळी ८ वाजेपर्यंत सर्व जड वाहतूक दौलताबाद टी पॉइंटपासून ते वेरूळपर्यंत व फुलंब्री ते खुलताबादपर्यंत भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.

औरंगाबाद कडून – कन्नड- धुळेकडे जाणारी सर्व जडवाहने ही दौलताबाद टी पॉइंट – माळीवाडा – कसाबखेडा फाटा मार्गे वेरूळ-कन्नडकडे जातील. कन्नडकडून येणारी सर्व जड वाहने वेरूळ – कसाबखेडा फाटा- माळीवाडामार्गे औरंगाबादकडे येतील. फुलंब्रीमार्गे खुलताबाद – कन्नडकडे जाणारी सर्व जड वाहने औरंगाबाद – कसाबखेडा फाटा – वेरूळमार्गे कन्नडकडे जातील. वेरूळ- खुलताबादकडून फुलंब्रीकडे जाणारी वाहने ही वेरूळ – कसाबखेडा फाटा – माळीवाडामार्गे औरंगाबादकडे जातील, असेही आदेशात नमूद आहे.

Share