मुंबई : छत्रपती शिवरायांचे कार्य सगळ्या विश्वात अतुलनीय आहे. त्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. काल प्रतापगड येथे झालेल्या कार्यक्रमात मी छत्रपती शिवरायांसंदर्भात उदाहरण दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्य असून राज्यात त्यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन अत्यंत चांगले काम करण्याचा आपला मानस आहे, असे राज्याचे कौशल्य विकास, पर्यटन आणि महिला-बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
लोढा यांनी काल प्रतापगडावर शिवरायांची आग्रा येथून सुटका या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तुलना केली होती. यावरून वादंग उसळल्याने लोढा यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
याबाबत लोढा म्हणाले की, माझी सर्वांना विनंती आहे की हा राजकारणाचा विषय नाही. आपल्या विधानाचा विपर्यास करून कृपया त्यावर राजकारण करू नये. छत्रपती शिवरायांचे कार्य हे फक्त राज्यातच काय तर संपूर्ण विश्वात त्यांच्या कार्याचा आदर्श घेतला जातो. त्यामुळेच इजराइलचे पंतप्रधान जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी रायगडाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवरायांच्या युद्धकौशल्यापासून प्रेरणा घेऊन इजराइल आजपर्यंत उभे आहे.
त्यामुळेच इजराइलच्या पंतप्रधानांनी रायगडाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही काही तुलना नव्हती. शिवरायांच्या कार्याशी कोणाचीही तुलना करता येऊ शकत नाही. त्यांचे कार्य सूर्यासारखे आहे. आमचे सरकार सकारात्मक काम करत आहे. मी सुद्धा माझ्याकडील तीन विभागांमध्ये काय काय चांगले करता येईल, यासाठी पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करत आहे. त्यामुळे कृपया शिवरायांच्या संदर्भात राजकारण करू नये, असे सर्वांना आवाहन आहे.