मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त; राज्याला अपंग करुन सोडलंय

मुंबई : गुवाहाटीतील वास्वव्य आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे राज्याला अपंग करून सोडलंय अशी घणाघाती टिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलीय.

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाहीत हे कळायला मार्ग नाही. ज्याअर्थी करत नाहीत त्याअर्थी त्यांच्यात मतभेद आहेत. जे लोक जीवाभावाची शिवसेना सोडून गेले आहेत ते फलप्राप्ती झाल्याशिवाय गप्प बसतील असं वाटत नाही. त्यामुळे मतभेदाची  जास्त शक्यता असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावलाय.
राज्यातील गोरगरीबांचे प्रश्न सुटण्याऐवजी आज वाढायला लागले आहेत. राज्यात पूर परिस्थिती मोठी आहे. पुरामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. पूरग्रस्त भागात पालकमंत्री नाहीत महाराष्ट्रात फक्त दोन मंत्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रुपाने आहेत. परंतु त्यांच्यातील गुंता सोडवण्यातच त्यांचा जास्त काळ जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

मंत्री नसल्याने राज्यात दयनीय स्थिती

राज्यात पूर परिस्थिती असल्याने जनता हवालदिल झाली आहे. हे लोक पावसाळा संपेपर्यंत थांबले असते तर आमचे आघाडीतील मंत्री पूरग्रस्त भागात ठाण मांडून बसले असते आणि फार मोठी मदत लोकांना झाली असती. महाराष्ट्रात मंत्री नसल्याने जिल्ह्या-जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली आहे आणि हीच अवस्था लोकांना चिंता करायला लावणारी आहे, असेही ते म्हणाले.
Share