सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दरे (ता. महाबळेश्वर) दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन तसेच धार्मिक व यात्रा स्थळांच्या विकास कामांचा आढावा घेतला. दरे येथील निवासस्थानी जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकास कामांची माहिती दिली. या प्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांना आणखीन चांगल्या वाढीव सुविधा निर्माण कराव्या. तसेच महाबळेश्वर, पाचगणी व्यतिरीक्त क वर्ग पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे क वर्ग पयर्टन स्थळांना चांगल्या सुविधा देण्यात येईल. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे त्यामुळे इतर ठिकाणीही पर्यटन वाढीसाठी आराखडा तयार करावा. जिल्ह्यात विविध यात्रा व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. या यात्रा व उत्साहांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यांच्या सुविधेसाठी ही निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री @mieknathshinde दोनदिवसीय #सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरे येथील निवासस्थानी आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी #महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्यातील 'क' वर्ग पर्यटनस्थळे तसेच धार्मिक – यात्रा स्थळांच्या विकासकामांचा आढावा घेतला. pic.twitter.com/kYKZFDiO78
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 31, 2022
महाबळेश्वर, पाचगणीसह जिल्ह्यातील २७ क वर्ग पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक, यात्रा स्थळांचा या आराखड्यामध्ये समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या पर्यटन विकास आराखड्याबाबत समाधान व्यक्त करुन शिंदे म्हणाले, या आराखड्यामध्ये स्थानिकांना रोजगार व पर्यटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच कोयना जलाशयाच्या ठिकाणी हाऊस बोट सारखी सुविधा निर्माण करण्याच्या सूचना करुन जिल्हा प्रशासनाकडून सादर करण्यात येणाऱ्या उपक्रमांना निधी तातडीने दिला जाईल, असेही शिंदे म्हणाले.
कास परीसरात फुलांचा हंगाम असल्यावरच पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. परंतु हे पर्यटक कास परिसरात बारमाही येण्यासाठी सुविधा वाढविण्याबाबत जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सूचविलेल्या उपाययोजनांना शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच सातारा येथील अजिंक्यतारा व महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ला संवर्धनासाठी वास्तुविशारद नेमावा यासाठीही निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशीही ग्वाही शिंदे यांनी दिली.