मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली,सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवसभरातील सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत. सततचे दौरे आणि पहाटेपर्यंत चालणाऱ्या सभा यांमुळे मुख्यमंत्र्यांना थकवा आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून शिंदेंना सक्त विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे सतत दिल्ली दौरे सुरु आहेत. याशिवाय महाराष्ट्र दौरा, उद्धाटनाचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, जाहीर सभा, बैठका यामध्ये एकनाथ शिंदे सतत व्यस्त आहेत. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असून त्यांना थकवा जाणवू लागला आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत. आपले सर्व कार्यक्रम रद्द करून फडणवीस दिल्लीला गेले आहेत. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. कोर्टाने सुनावणी पुढे ढकलल्यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा करायला फडणवीस दिल्लीत गेल्याचं सांगितलं जात आहे.

Share