औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या ८ जूनला औरंगाबाद शहरात जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेला कालपर्यंत परवानगी मिळाली नव्हती. मात्र आज अखेर पोलिसांकडून या सभेसाठी १६ अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्र्याची ही सभा शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडणार असून, काहीच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा या ठिकाणी पार पडली होती. त्यानंतर याच मैदानावर उद्धव ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान औरंगाबाद शहराच्या नामांतरणाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला कारण ठरलेला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत भाषण करताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला होता. आपण स्वत: संभाजीनगर म्हणतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांची ८ जूनला सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत औरंगाबादचं संभाजीनगर असं अधिकृतपणे नामांतरणं उल्लेख केलं जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून रहिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या अटी
-जाहीर सभा ठरलेल्या वेळेतच आयोजीत करावी.कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.
-सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येतांना व परत जातांना कोणीही घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
-सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये.
– कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये अथवा प्रदर्शन करु नये. तसेच शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.
-सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार घरले जाईल.
-सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपका बाबत मा. सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुण (नियंत्रण व नियमन ) प्रमाणे आवजाची मर्यादा असावी
-कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आयोजकांमार्फत कायदा व सुव्यस्थेस कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही याची जबाबदारी संबंधित आयोजकांची राहील,यासह एकूण १६अटीशर्तींसह सभेला परवागनी देण्यात आली आहे.