काश्मीर खोऱ्यातील ‘टार्गेट किलिंग’ मुळे काश्मिरी पंडित चिंताग्रस्त

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये ‘टार्गेट किलिंग’च्या घटना वाढत असून, त्यात प्रामुख्याने काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांकडून सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. सातत्याने होत असलेल्या हत्यांमुळे काश्मिरी पंडित चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे आता काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. श्रीनगरमधील विविध भागात तैनात असलेल्या १७७ शिक्षकांची जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. दहशतवाद्यांकडून सरकारी कर्मचाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर प्रशासनाने काश्मिरी पंडितांसह अल्पसंख्याक समुदायातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार श्रीनगरमधील विविध भागात कार्यरत असलेल्या १७७ शिक्षकांची जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. श्रीनगरच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांकडून सतत जीवघेणे हल्ले होत आहेत. गेल्या महिन्याभरात हल्ल्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्यासाठी आता प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत. काश्मिरी पंडितांच्या हत्येने खोऱ्यात संतापाचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यात एका बँकेत घुसून तरुण व्यवस्थापकाची हत्या केली. त्याआधी कुलगाममध्येच गोपालपोरा भागात दहशतवाद्यांनी शाळेत घुसून काश्मिरी पंडित शिक्षिका रजनी बाला यांच्यावर गोळी झाडून त्यांना ठार मारले. काश्मिरी पंडितांच्या हत्या होत असल्याने काश्मीर खोऱ्यात दहशतीचे वातावरण आहे.

सरकारी कर्मचारी रस्त्यावर

काश्मीर खोऱ्यातील पंडितांना दहशतवादी संघटनांकडून वारंवार धमक्या मिळत आहेत. लवकरात लवकर काश्मीर खोरे सोडा, अशा धमक्या दहशतवाद्यांकडून दिल्या जात आहेत. त्यातच गेल्या महिन्याभरात अनेक पंडितांच्या दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काश्मिरी पंडित भयभीत झाले आहेत. जम्मू शहरात तत्काळ बदली व्हावी यासाठी गुरुवारी शेकडो सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. सरकारने आम्हाला सुरक्षित वातावरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. जोपर्यंत सुरक्षेसाठी सुरक्षेसाठी पावलं उचलली जात नाहीत, तोपर्यंत काम करणार नाही, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता.

गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा

दरम्यान, काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीला जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक कुलदीप सिंह आणि सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख पंकज सिंह उपस्थित होते.

बडगाम जिल्हा बनला दहशतवादी कारवायांचे केंद्र
गेल्या महिन्याभरात काश्मिरी पंडितांना टार्गेट करण्यात आल्याच्या सात घटना घडल्या आहेत. त्यामुळे खोऱ्यातील हिंदूंमध्ये दहशत पसरली आहे. मध्य काश्मीरचा बडगाम जिल्हा दहशतवादी कारवायांचे एक नवीन केंद्र बनला आहे. गेल्या काही दिवसांत हत्यांच्या मालिकेमुळे बडगाम जिल्हा चर्चेत आला आहे. वाढत्या हत्यांमुळे सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यावर्षी मार्चपासून श्रीनगर, पुलवामा आणि बारामुल्ला जिल्ह्यांच्या सीमेला लागून असलेल्या बडगाममध्ये पाच टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत.

गुरुवारी बडगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात एका स्थलांतरित मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. २५ मे रोजी अज्ञात बंदुकधारींनी बडगाम येथील सोशल मीडिया स्टार अमरीन भट यांची त्यांच्या घरी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याआधी १२ मे रोजी बडगाममधील चदूरा तहसील कार्यालयात काश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी राहुल भट यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. २१ मार्चला बडगाममध्ये तजमुल मोहिउद्दीन राथेर या नागरिकाचीही हत्या झाली होती. दोन आठवड्यांपूर्वी टेरिटोरियल आर्मीचा जवान समीर अहमद मल्ला याचे लोकीपोरा येथून अपहरण करून हत्या करण्यात आली होती.

Share