मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज शनिवारी वांद्रे (पूर्व) येथील बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानावर जाहीर सभा होणार आहे. आजची ही सभा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक अशी होईल, आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप अशी ही आजची सभा असणार आहे. या सभेतून सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेतून विरोधकांना करारा जवाब देतील, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होत आहे. भोंगा, हनुमान चालिसा, हिंदुत्व, भ्रष्टाचार आणि इतर विविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडी सरकार आणि खास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर काही दिवसांपूर्वी झालेल्या सभांमधून निशाणा साधला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार किरीट सोमय्या व अन्य भाजप नेतेही मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीकेची झोड उठवत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजची बीकेसीच्या मैदानावर होणारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, काही जण महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही जण राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्याला आज उद्धव ठाकरे जाहीर सभेतून करारा जवाब देतील. शिवसेनेच्या मुंबईतील सभांची परंपरा विराट, अतिवराट अशी आहे. आजच्या सभेचे व्यासपीठ पाहाल तर ते इतके मोठे आहे की, इतके मोठे व्यासपीठ यापूर्वी निर्माण झाले नव्हते. भव्य असे व्यासपीठ आहे. शिवसेनेचा कारभार भव्यच असतो. मैदानात उतरण्याच्या निश्चयाने, जिद्दीने उतरण्यासाठी या सभेचे आयोजन केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची शिवसैनिक अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. गेल्या दोन वर्षात उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन संवाद सांधला, बैठका घेतल्या; पण विराट सभा प्रदीर्घ कालावधीनंतर होत आहे. शिवसेना आणि गर्दी यांचे नाते आहे. समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, गर्दी आणावी लागत नाही. बाळासाहेबांचा विचार, राज्याचा आणि विकासाचा विचार आहे. या विचाराचे लोहचुंबक आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आहे. या सभेतून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल. अडीच वर्षानंतर अशी सभा होत आहे. संपूर्ण देश त्यांचे विचार ऐकू इच्छितो. ऐतिहासिक आणि क्रांतिकारक रॅली होईल. महाराष्ट्रातील, देशातील वातावरण आणि वातावरणावर आलेले मळभ, धुके, गढूळपणा हे उद्धव ठाकरेंच्या भाषणाने दूर होईल. महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल. या आकाशात भगव्या रंगाचाच धनुष्य दिसेल. अर्थात हे राज्य आणि शिवसेना पक्ष पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा आहे. काही लोकं राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही अडथळे निर्माण करत आहेत. ही पोटदुखी, जळजळ आहे त्यावर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील. कोणाचा ‘बुस्टर डोस’ माहिती नाही; पण ‘मास्टर ब्लास्टर डोस’ आमचाच असेल. आमची फटकेबाजी असते. ‘प्युअर मास्टर ब्लास्टर डोस’ असतो, अशा शब्दांत संजय राऊतांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधला.
लगता है फिरसे उतरना
पडेगा मैदान में दुबारा:
कूछ लोग भूल गये है..
अंदाज हमारा!!!
जय महाराष्ट्र!
आज क्रांतिकारी दिवस!! pic.twitter.com/G9SHBuIdU0— Sanjay Raut (@rautsanjay61) May 14, 2022
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच होते आणि राहतील!
हिंदुहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरे हेच होते आणि राहतील आणि आहेत. बाकी आम्ही सगळे हिंदूंचे संघटन करत आहोत आणि त्यांना लढण्याची प्रेरणा देत आहोत. हिंदुजननायक कोण?, महानायक कोण? हे प्रश्न या देशात उपस्थित होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुहृदयसम्राट होते आणि राहतील आणि लोकांच्या हृदयात त्यांचे स्थान कायम राहील, असे संजय राऊत म्हणाले.
केतकी चितळेवर टीका
अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे, त्यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, काही लोकं हिमालया एवढे असतात, काही व्यक्ती सूर्याच्या तेजाइतक्या तळपत असतात. सूर्यावरती थुंकले आणि हिमालयाकडे तोंड वेडावून दाखवले तर त्यांचे महत्त्व कमी होत नाही. हे नशेबाज लोकं आहेत. त्यांना कोणीतरी नशा चढवली आहे. दुर्लक्ष केले पाहिजे. महाराष्ट्रात देशात असे क्षुद्र कीटक वावरत असतात. खिडकी उघडली आणि हवा आली की, हवेबरोबर ते वाहून जातील, अशा शब्दांत संजय राऊतांनी केतकी चितळेचे नाव न घेता टीका केली.