इकडे या, कुठलीही भानगड न ठेवता मुख्यमंत्रीपद देऊ! जयंत पाटलांची शिंदेंना विधानसभेतच ऑफर

मुंबई : मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आहे, असे चंद्रकांत पाटील एका बैठकीत म्हणाले होते. भारतीय जनता पक्षाने मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असेल तर कुठलीही भानगड ठेवता आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ. तुमच्यातील गुण पाहता आमच्यातील कोणीही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देण्यास विरोध करणार नाही, अशी खोचक टोला राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना लागवला.

जयंत पाटील म्हणाले की, हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्तासंघर्षाचा प्रश्न आता न्यायालयात आहे. आपण मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत असताना देवेंद्र फडणवीसांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत, अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही तसे करत असाल. मात्र बरेच निर्णय देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसतात. हे सत्य असेल तर तुम्ही तुमचा कणखरपणा दाखवत आहात, असा मिश्किल टोलादेखील जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

याशिवाय जयंत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील व्हायरल झालेल्या फोटोवरूनही विधान केलं. ‘मुख्यमंत्री दिल्लीत गेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या छायाचित्रात त्यांना तिसऱ्या क्रमांकाच्या रांगेत उभे राहावे लागले. हा महाराष्ट्राचा अवमान आहे. आम्ही तो सहन करणार नाही. खरे तर त्यादिवशीच मुख्यमंत्र्यांनी तेथून बाहेर पडायला हवे होते’, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे गटातील इतर नेत्यांची खिल्ली देखील उडवली. खातेवाटपावरून शिंदे गटातील नाराजीवर जयंत पाटलांनी टोमणे मारले. ‘शंभूराज देसाई यांना उत्पादनशुल्क सारखे किरकोळ खाते दिले. आमचे शिवेंद्रसिंह भोसले हे साताऱ्याचे पालकमंत्री होण्यासाठी म्हणून भाजपमध्ये गेले. त्यांनाही काही मिळाले नाही. संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, बच्चू कडू अशी नाराजांची फौज या सरकारमध्ये आहे’. अशी टोलेबाजी जयंत पाटलांनी केली.

Share