औरंगाबादेत युवा सेनेच्या मेळाव्यानंतर दोन गटात राडा

औरंगाबाद-  येथील युवासेनेने आयोजित केलेल्या निश्चय मेळाव्यात काल दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून या प्रसंगी  कोणतिही तक्रार अथवा गुन्हा नोंदवलेला नसल्याचं पोलिसांना सांगितल आहे. राडा करणाऱ्या काही तरुणांचा शिवसेना किंवा युवा सेनेशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला जात आहे.

शहरातील एकनाथ नाट्य रंग मंदिरात पार पडलेल्या मेळाव्यानंतर युवा सेनेचे स्थानिक पदाधिकारी कसुरे यांना एक-दोन तरुण येऊन भिडले. त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत आले. युवा सेनेचे अनेक कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यक्रम उधळण्यासाठी आलेल्या तरुणांना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला. अखेर युवा सेनेचे सचिव आणि ठाकरे कुटुंबीयांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या वरुण सरदेसाई यांच्यासमोर राडा नको म्हणून प्रकरण मिटवण्यात आले. या वेळी मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांचा मोठा ताफाही घटनास्थळी दाखल झाला होता. मात्र, तोपर्यंत प्रकरण शांत झालेले दिसले. या प्रकरणी कुठलीही तक्रार आली नसून कोणाला आम्ही ताब्यातही घेतले नाही, अशी माहिती उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता अरवडे यांनी सांगितले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे भारतीय विद्यार्थी सेना प्रमुख तुकाराम सराफ यांनी वाद घालणाऱ्या तरुणांचा युवा सेना किंवा शिवसेनेशी कुठलाही संबंध नसून ते बाहेरचे कोणीतरी अनामिक असल्याचे सांगितले.

Share