काँग्रेसने आखला १०० दिवसांचा कृती कार्यक्रम; नेत्यांनी केला निर्धार

मुंबई : शिर्डी येथे मागील महिन्यात काॅँग्रेसचे नवसंकल्प शिबीर घेण्यात आले. या शिबीरात काॅंग्रेससाठी एक कृती कार्यक्रम घेण्याचे ठरले होते. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीने महाराष्ट्रात १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबविण्याचे ठरविले असून यांची घोषणा काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

गांधी भवन येथे शिर्डी नवसंकल्प घोषणापत्र व कृतीकार्यक्रम जाहीर करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, आदी उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर प्रदेश काँग्रेसने शिर्डी येथे १ व २ जून रोजी घेतलेल्या नवसंकल्प कार्यशाळेतील घोषणापत्राची अंमलबाजणी राज्यभर केली जाणार आहे. भाजपाच्या ‘भारत तोडो’ ला काँग्रेस ‘भारत जोडो’ अभियानाच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. शिर्डी घोषणापत्र व कृतीकार्यक्रमाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती पटोले यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, शिर्डी कार्यशाळेसाठी उदयपूर शिबिराच्या धर्तीवर सहा विषयांसाठी सहा गट स्थापन करण्यात आले होते. या सहा गटांनी चर्चा करून त्यांचा अहवाल सादर केला. यातूनच शिर्डी घोषणापत्र व कृतीकार्यक्रम तयार करण्यात आला आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, अग्निपथ, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आवाज उठवणार आहे.

राज्यभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्या-जिल्ह्यात पदयात्रा काढून जनजागृती केली जाणार आहे. तसेच २ ऑक्टोबरपासून ‘भारत जोडो’ अभिनयानही राबविले जाणार आहे. काँग्रेसचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवतानाच केंद्र सरकारच्या अपयशाची माहितीही जनतेला करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share