कोरोनावरील उपचारासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. सोनिया गांधी यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर प्रकृतीच्या समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांना नवी दिल्लीतील गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सोनिया गांधी यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. रणदीप सुरजेवाला यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. ”कोरोनाशी संबंधित समस्येमुळे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. सध्या त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते तसेच सोनिया गांधी यांच्या हितचिंतकांचे आम्ही आभार मानतो,” असे रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे सुपुत्र, काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांना ईडीने ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणी समन्स पाठवले होते. ईडीने सुरुवातीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ८ जूनला चौकशीसाठी हजर रहावे, असे म्हटले होते. मात्र, सोनिया गांधी यांना कोरोना संसर्ग झाल्याने ईडीकडून नवे समन्स जारी करण्यात आले आहे. ईडीने सोनिया गांधी यांना २३ जून रोजी ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात चौकशीसाठी हजर रहावे, असे समन्स नव्याने पाठवले आहे.

२ जून रोजी सोनिया गांधी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला होता. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांनी ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीसमोर चौकशीसाठी हजर होण्याकरिता आणखी वेळ मागितला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांना येत्या २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाचे समन्स जारी करण्यात आले आहे.

दरम्यान, ईडीने राहुल गांधी यांना ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणी १३ जून रोजी हजर राहण्याचे समन्स दिले होते. राहुल गांधी यांना यापूर्वी ईडीने २ जून रोजी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, त्यावेळी राहुल गांधी परदेशात असल्याने चौकशीला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यानंतर ईडीने त्यांना १३ जूनला उपस्थित राहण्याचे समन्स बजावले आहे.

Share