बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; ३५ कामगारांचा होरपळून मृत्यू

ढाका : बांगलादेशमधील चितगॉंग येथे एका शिपिंग कंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाला असून, ४५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शनिवारी (४ जून) रात्री ही भीषण आग लागली होती. या घटनेत अग्निशमन दलाचे पाच जवानदेखील मृत्युमुखी पडले असून अजूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशमधील चितगॉंगमधील शितकुंडा येथे एका शिपिंग कंटेनरच्या डेपोला शनिवारी रात्री ही भीषण आग लागली. या आगीमध्ये आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला असून ४५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आगीत आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अग्निशामक दलाच्या पाच जवानांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगीवर अजूनही पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही, अशी माहिती बांगलादेश आरोग्य विभागाचे संचालक हसन शहरयार यांनी दिली असल्याचे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे.

ही आग रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे लागली असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. तसेच रात्री साधारण ९ वाजता ही आग लागली होती. त्यानंतर येथे मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश बांगलादेश सरकारने दिले आहेत.

Share