आलिया-रणबीरच्या घरी हलणार पाळणा; आलिया लवकरच होणार आई

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले आहेत. त्यानंतर आता त्यांच्या घरात लवकरच पाळणा हलणार असून, नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. आलिया भट्ट लवकरच आई होणार असून, तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही ‘गुड न्यूज’ दिली आहे. रणबीर आणि आलिया भट्ट लवकरच आई-बाबा होणार असल्याची ‘गुड न्यूज’ मिळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघे गेल्या १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न बंधनात अडकले. मुंबईत झालेल्या त्यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाला दोन महिने होऊन गेले तरीसुद्धा अजूनही त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरूच आहेत. आता आलिया आणि रणबीरने त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आलिया आई होणार आहे. आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने ही ‘गुड न्यूज’ दिली आहे. या पोस्टसोबत आलियाने रुग्णालयातील सोनोग्राफीचा फोटो शेअर केला असून, त्यावर अशी कॅप्शन दिली आहे की, ‘आमचं बाळ… लवकरच येणार’. या फोटोमध्ये आलियाच्या शेजारी रणबीर बसल्याचे दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CfS-_HvMhQ8/?utm_source=ig_web_copy_link

आलियाने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटसृष्टीतील बऱ्याच सेलिब्रिटींनीही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रणबीर कपूरची बहीण रीधिमा कपूर हिने आलियाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत रणबीर आणि आलिया या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत. रीधिमा कपूर हिने एक फोटो पोस्ट केला आहे. ‘माझ्या बाळांना आता बाळ होणार आहे…’, अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे.

आलियाची आई सोनी राजदान यांनीही आलियाच्या पोस्टवर ‘तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा’ (Congratulations Mama and Papa lion) अशी कमेंट केली आहे. आलियाचा बेस्ट फ्रेंड व निर्माता करण जोहरने ‘आनंद हृदयात मावत नाही’ (Heart is Bursting) अशी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे, तर प्रियांकाने ‘तुम्हाला शुभेच्छा,’ मी प्रतीक्षा करू शकत नाही’, अशी कमेंट केली आहे.

अभिनेता रणबीर कपूरने मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये गंमतीत बोलताना सांगितले होते की, तो लवकरच टॅटू काढणार आहे. हा टॅटू एक तर त्याचा लकी नंबर ८ चा असेल किंवा त्याच्या मुलांच्या नावाचा असेल. आलिया आई होणार असल्याची बातमी कळताच तिच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

रणबीरने गेल्या १४ एप्रिल रोजी आलियाशी लग्न केले. लग्नानंतर हे दोघेही आता येत्या ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये एकत्र दिसणार आहेत. रणबीर आणि आलियासाठी हा चित्रपट खूप खास आहे. कारण, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांपासून आलिया आणि रणबीर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची चर्चा होत आहे. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये किंग खान शाहरुख खान प्रमाणेच दीपिका पदूकोणही दिसणार आहे. दीपिका या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ प्रमाणेच रणबीरच्या ‘शमशेरा’ या चित्रपटाचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘शमशेरा’ चित्रपटाचा ट्रेलर गेल्या आठवड्यात रिलीज झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

Share