‘अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर…’; काकांच्या आठवणीने धनंजय मुंडे भावूक

बीड : भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांची आज (३ जून) आठवी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि गोपीनाथराव मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून स्व.गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली अर्पण केली. ‘अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर…’ असे म्हणत काकांच्या आठवणीने धनंजय मुंडे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

“अजूनही आठवतो तो ३ जूनचा काळा दिवस… आजही असं वाटतं अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर… अप्पा, तुम्ही नाहीत, पण तुमची चेतना आजही आमच्यात आहे, तुमचा आवाज आजही कानात घुमतो! भावपूर्ण आदरांजली अप्पा…” असे धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त आज परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

Share