पंकजा मुंडे झाल्या वाढपी; गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांची तोबा गर्दी

बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त आज परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनानंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वतः वाढपी होऊन जेवायला बसलेल्या भाविकांना आग्रहाने जेवण वाढले.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज (३ जून) आठवी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गोपीनाथरावांच्या पुण्यतिथीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी ह. भ. प.रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन झाले. या कीर्तनात स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञाताई मुंडे, कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे, त्यांचे पती अमित पालवे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, त्यांचे पती गौरव खाडे यांच्यासह मुंडे परिवारातील अन्य सदस्य तसेच भाजप कार्यकर्ते व स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनानंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याच महाप्रसादाच्या वेळेस पंकजा मुंडे यांनी स्वतः वाढप्याची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी, स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या धाकट्या कन्या आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे याही गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीवर नतमस्तक झाल्या. दर्शनावेळी प्रीतम मुंडे भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 

 

 

 

Share