ताडोबा प्रकल्पातील जगप्रसिद्ध ‘वाघडोह’ वाघाचा मृत्यू

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सर्वात मोठा किंबहुना देशातील सर्वात मोठा वाघ मानल्या जाणाऱ्या ‘वाघडोह ऊर्फ स्केअरफेस’ वाघाचा सोमवारी वयाच्या सतराव्या वर्षी मृत्यू झाला. हा वाघ सोमवारी चंद्रपूरच्या  सिनाळा जंगलात मृतावस्थेत आढळला. वृद्धापकाळामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘वाघडोह’ ला गेल्या काही दिवसांपासून शिकार करणे कठीण झाले होते. मोहर्ली वन क्षेत्रातील अंधारी नदीजवळील वाघडोह येथे २००७ साली त्याचा जन्म झाला होता. तिथेच त्याचा अधिवास राहिल्याने त्याला ‘वाघडोह’ हे नाव पडले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ४० टक्के वाघ वाघडोहाच्याच वंशावळीतील आहेत. यात माया, तारा, लारा, माधुरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघ आणि वाघिणींचा समावेश आहे. यामुळे त्याची ‘बिग डॅडी’ अशीही ओळख निर्माण झाली होती. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे त्याच्यावर लक्ष होते.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघडोह या वाघाची एके काळी दहशत होती. अतिशय धिप्पाड असलेल्या वाघडोहने मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वीपर्यंत ही दहशत कायम ठेवली. दोन दिवसांपूर्वीच सिनाळा गावाजवळ त्याने दशरथ पेंदोर (वय ६५) या गुराख्याला ठार केले. ताडोबाचे अधिकारी व कर्मचारी वाघडोहवर लक्ष ठेवून होते. अशातच २३ मे रोजी सकाळी त्याचा मृतदेहच सापडला. ‘वाघडोह’चे शवविच्छेदन करणारे ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीच वाघडोहचा मृत्यू झाला असावा. कारण शरीर पूर्णत: सडलेले होते. चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक लोणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वाघडोह’चा हल्ली मुक्काम चंद्रपूर वन विभागाच्या सिनाळा गाव परिसरात होता. चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये या वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर नमुने पुढील तपासणीसाठी नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

‘वाघडोह’ हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालवल्यानंतर युवा वाघांनी त्याला वृद्धापकाळात बाहेर हुसकावले. तेव्हापासून तो ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या जंगलात भटकत होता. वय वाढल्याने शिकार करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे गावाशेजारी वास्तव्य करून सहज मिळणारी शिकार करून तो जगत होता. हा वाघ २०१० मध्ये ताडोबा परिसरात दिसला. त्यावेळी तो सुमारे साडेचार वर्षांचा होता. आला तेव्हापासून त्याने वर्चस्व प्रस्थापित केले. प्रसिद्ध वाघीण ‘माधुरी’ ही त्याची पहिली जोडीदार होती. त्यांच्या बछड्यांनीही ताडोब्याच्या जंगलावर अधिराज्य गाजविले. पिल्लांची आई शिकारीसाठी गेली की, ‘वाघडोह’ पिलांची काळजी घ्यायचा. त्याच्यामुळे त्याची पिल्ले खूप जगली. ताडोब्याला प्रसिद्धी मिळवून देण्यात, ताडोब्याच्या विकासात या वाघाचा मोलाचा वाटा होता.

Share