गडचिरोलीतील कटेझरी येथील पोलीस इमारतीचे लोकार्पण

गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच स्व. आर. आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यत आम्ही गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकासकामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृह विभाग, अर्थ विभाग आहेच. परंतू संपूर्ण कॅबिनेट संपूर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथील कार्यक्रमात दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अर्थमंत्री या नात्याने आम्हाला गृह विभागाकडून सी-६० जवानांच्या भत्त्यामधील वाढीचा प्रस्ताव आला होता. तो तातडीने मंजूर केला. तसेच यापूर्वी नक्षल भागात कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनातही वाढ केली आहे. आता गडचिरोलीत सैन्य दलातील दवाखान्याच्या धर्तीवर सुसज्ज दवाखाना निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. आरोग्य प्रतिपूर्ति देयकाच्या यादीत अकरा नवीन आजारांचा समावेश केला आहे. अशा प्रकारे जवानांची सुरक्षा, चांगले आरोग्य व त्यांचे चांगले राहणीमान यासाठी नेहमीच प्रयत्न करु, असे पवार म्हणाले.

सी-६० जवानांच्या कार्यक्रमात आतापर्यत विविध चकमकींमध्ये जवानांनी दिलेल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी मंचावर आलेल्या प्रत्येक जवानाची अजितदादांनी आदराने विचारपूस केली व कौतुकाची थाप मारली. राज्यात, जिल्ह्यात शांतता अखंड रहावी म्हणून तुम्ही अहोरात्र मेहनत घेता, यासाठी मी सर्व सी-६० जवानांना सलाम करतो, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.

 

Share