स्पाईसजेटवर झळकणारी अमृता पहिली मराठी अभिनेत्री

 अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे स्टारर चंद्रमुखी हा चित्रपट २९ एप्रिलला थिएटर मध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. विशेष म्हणजे चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच मराठी चित्रपटाच्या शिरपेचात एक मानाच तुरा रोवला गेला आहे. मराठीत मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचे पोस्टर विमानवर झळकले आहे. स्पाईसजेटच्या विमानावर चंद्रमुखी या चित्रपटाचे पोस्टर झळकले आहे. या पोस्टवर अमृता खानविलकर झळकली आहे. हा मान मिळवणारी अमृता पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे. अमृता आणि मराठी मनोरंजन विश्वासाठी ही अभिमानाची गोष्ट असून अनेकांनी यासाठी अमृताचे कौतुक केले आहे.

या प्रमोशनसाठी अमृता आणि आदिनाथ यांनी गुरुवारी सकाळीच एअरपोर्टवर हजेरी लावली होती. यावेळी अमृताने लाल रंगाची नववारी साडी नेसली होती. हे दोघेही विमानतळावर असल्याची माहिती अमृताने स्वतः एक गमतीशीर व्हिडिओ करून दिली होती. पुढे काही वेळातच ‘चंद्रमुखी’ची टीम धावपट्टीवर दाखल झाली. यावेळी स्पाईसजेटच्या विमानावर ‘चंद्रमुखी’चे पोस्टर झळकवण्यात आले. हे पोस्टर पाहून अमृताही भारावून गेली होती. यावेळी अमृताने विमानाजवळ जाऊन ‘चंद्रा’ची साइन पोज दिली. तसेच चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावरही ती थिरकली.

‘कच्चा लिंबू’ आणि ‘हिरकणी’ सारखे लोकप्रिय चित्रपट देणारा अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट विश्वास पाटील लिखित याच नावाच्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय–अतुल या दमदार जोडीने ‘चंद्रमुखी’ला संगीत दिले आहे. तर अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेन्मेंट, लाइटविदिन एंटरटेन्मेंट सहप्रस्तूत हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Share