दीपक केसरकर यांनी २०२४ मध्ये तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी – संजय राऊत

मुंबई : आम्ही आमच्या पक्षासाठी महाराष्ट्रासाठी पुन्हा जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाहीत. आम्ही तुमच्यासारखे लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही. तुम्ही म्हणजे कायदा नाही. दीपक केसरकर मला तुरुंगात पाठवण्याची भाषा करत असतील तर २०२४ साली त्यांनीही जेल जाण्याची तयारी ठेवावी. असा पलटवार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यामांशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसह शिवसेनेची युतीसंदर्भात बोलणी सुरू असल्याच्या वृत्ताला संजय राऊतांनी दुजोरा दिला. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेतील चर्चेची माहिती मविआच्या नेत्यांना अधिकृतपणे दिली आहे. कुणाचा विरोध आहे, कुणाचा नाही हे भविष्यात कळेल. पण महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी शक्ती प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकवटली आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचं संघटन आपल्यासोबत आलं, तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरू होईल, असं संजय राऊत म्हणाले.

आमची इच्छा होती की शिवशक्ती आणि भीमशक्तीनं एकत्र यावं. सध्या दिल्लीत आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं सत्ताकारण सुरू आहे, ते उलथवून टाकायचं असेल, तर त्यासाठी या दोन शक्ती एकत्र येणं गरजेचं आहे. प्रकाश आंबेडकर किंवा आम्ही सगळे त्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत, असंही राऊत यावेळी म्हणाले.

Share