मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असे विधान भाजपचे आमदार संजय कुटे यांनी केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात नुकतेच झालेल्या सत्तांतराचे खरे सूत्रधार हे फडणवीसच होते, असा खुलासाही त्यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार संजय कुटे म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासातील हे ऐतिहासिक सत्तानाट्य होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस या सर्व यशाचे सूत्रधार होते. त्यानंतर जे घडले त्यामुळे भाजपमधील काही लोक नाराज झाले असतील;पण फडणवीस यांच्यासारखा त्यागमूर्ती असलेला नेता या महाराष्ट्राला मिळाला याचे आम्ही भाग्य समजतो. सत्तेसाठी आम्ही हे केलेले नाही. ज्या विचारांवर आम्ही जगतो आहे त्याला गेल्या अडीच वर्षात तडा जात होता. त्यामुळे हिंदुत्वाचे विविध विषय मागे पडत होते. २०१९ साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युतीला लोकांनी निवडून दिले होते, ते हिंदुत्ववादी सरकार कोणत्याही परिस्थितीत पुनर्स्थापित व्हावे आणि हा विचार पुढे जावा यासाठी फडणवीसांनी मोठा त्याग केला. हा त्याग नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्यदेखील करू शकत नाही. त्यामुळे हे ऐतिहासिक सत्तांतर झाले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की, शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा. हे त्यांचे स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले. त्यामुळे फडणवीस हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहेत.
जेव्हा सत्तांतराच्या घडामोडी घडत होत्या त्यावेळी त्या कोणालाही माहिती नव्हत्या. पुढील काही तासात काय घडत आहे हे कोणालाही माहिती नव्हते. त्यामुळे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत हे कळाले तेव्हा ही भावना उफाळून आली की, असे कसे झाले? त्यामुळे भाजपच्या आमदारांनी केंद्रीय नेतृत्वाकडे विचारणा केली की, फडणवीस नसतील तर हे कसे काय होईल? पण फडणवीसा यांनी ठरवले होते की, मी सत्तेत राहणार नाही, २०२४ च्या निवडणुकीसाठी मी तयारी करेन; पण भाजपचे खासदार, आमदार यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनाही विनंतीवजा आदेश द्यावे लागले. तुमचे नेतृत्व मोठे आहे; पण एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला तिथे (सरकारमध्ये) गेलेच पाहिजे, हा आदेश केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांना देण्यात आला. त्यामुळे त्यांच्या इच्छेविरुद्ध फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले आणि सत्तेत सामील व्हावे लागले, असेही आ.संजय कुटे यांनी यावेळी सांगितले.