शिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी आज विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडले. त्यात राहुल नार्वेकर यांनी बहुमतापेक्षा जास्त म्हणजे १६४ मते मिळवून बाजी मारली. त्यामुळे भाजप आणि शिंदे सरकारने एक मोठी लढाई जिंकली आहे. नार्वेकर यांना या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष आमदारांची अशी एकूण १६४ मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ इतकी मते मिळाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशाने नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी बोलावण्यात आले आहे. या विशेष अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. आज रविवारी (३ जुलै) सकाळी अकरा वाजता अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी, असा प्रस्ताव भाजपकडून चंद्रकांत पाटील यांनी मांडला. गिरीश महाजन यांनी त्याला अनुमोदन दिले. महाविकास आघाडीकडून चेतन तुपे यांनी राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. संग्राम थोपटे यांनी त्याला अनुमोदन दिले. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोठ्या गदारोळात मतदान पार पडले.

मतमोजणी सुरू असतानाच जयंत पाटलांची सूचना आणि फडणवीसांचे अनुमोदन
मतदान झाल्यानंतर शिरगणतीद्वारे विधानसभा अध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरू झाली. ही मतमोजणी सुरू असतानाच १४ क्रमांकाच्या मतापर्यंत मोजणी जाताच गोंधळ उडाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.जयंत पाटील यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत काही सूचना केल्या. शिरगणतीद्वारे सत्ताधारी आमदार १, २, ३ याप्रमाणे मत देत होते; पण यात काही आमदारांनी त्यांचा आसन क्रमांकच सांगितला. यामुळे विधिमंडळात चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आणि आसन क्रमांकाप्रमाणेच मतमोजणी करण्याची विनंती केली. याला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनुमोदन दिले आणि त्यानुसार शिरगणतीला सुरुवात करण्यात आली.
त्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना शिंदे गट, भाजप आणि अपक्ष आमदारांची अशी एकूण १६४ मते मिळाली, तर त्यांच्याविरोधातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ इतकी मते मिळाली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि एआयएमआयएमचे शाह फारुख अन्वर व रईस शेख हे आमदार तटस्थ राहिले. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील आमदार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिवसेना उमेदवार राजन साळवी यांना मतदान केले. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना राजन साळवी यांच्यापेक्षा जास्त मते मिळाल्याने ते विजयी झाल्याचे पिठासन अधिकारी तथा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी घोषित केले.

शिवसेनेचा ‘व्हीप’ धुडकावत शिंदे गटाचा राहुल नार्वेकरांना पाठिंबा

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या मतदानासाठी शिवसेनेकडून पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेच्या सराव आमदारांना ‘व्हीप’ जारी केला होता; परंतु शिवसेनेचा ‘व्हीप’ धुडकावत बंडखोर शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी राहुल नार्वेकर यांना पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. पिठासन अधिकारी नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाने शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला मतदान केले नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे आता या बंडखोर आमदारांवर शिवसेना नेतृत्व कोणती कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भगवे फेटे बांधून भाजपा – शिंदे गटातले आमदार विधानभवनात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे सर्व आमदार आज भगवा फेटा बांधून विधानभवनात दाखल झाले. भाजप आमदारांनीही भगवे फेटे बांधून एकत्र प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांनी  विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.


राहुल नार्वेकर सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष
गेल्या वर्षी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले होते. तोपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे अध्यक्षपदाचे कामकाज पाहत होते. मात्र, आज ४५ वर्षीय राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अध्यपदाचा कारभार त्यांच्या हातात सुपूर्त करण्यात आला. राहुल नार्वेकर आतापर्यंतचे सर्वात तरुण असे विधानसभा अध्यक्ष बनले आहेत.

विधिमंडळात आता जावई-सासऱ्याची जोडी

राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यामुळे आता विधान परिषदेत रामराजे नाईक निंबाळकर तर विधानसभेत राहुल नार्वेकर अशी सासरे जावयाचे राज्य विधानमंडळावर असणार आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत विधान परिषदेत निवडून आले होते. तीन वर्षे ते राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य होते. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता ते विधानसभा अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या सत्तासंघर्षामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. अखेर या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.







Share