तूर्तास नवीन भोंगा कोणता लावायचा यावर विचारविनिमय सुरू आहे – राष्ट्रवादी काॅँग्रेस

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला आहे. स्वत: राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे. तर, रविवारी पुण्यातली सभा होणार असल्याचं स्पष्ट करतानाच या सभेत दौरा का रद्द केला याची माहिती देणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मात्र भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राज यांनी हा दौरा रद्द केल्याची टीका त्यांच्या राजकीय विरोधकांकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसने तिरकस शैलीत भाष्य करत राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

काय आहे ट्विट
तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच… असं ट्विट राष्ट्रवादीने केलं आहे.

राज ठाकरेंवर होणार शस्त्रक्रिया

प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या पायाला एक ते दीड वर्षांपूर्वी दुखापत झाली होती. तेव्हापासून राज ठाकरे यांना हा त्रास जाणवत आहे. त्यामुळे पायाच्या दुखापतीमुळे राज ठाकरे यांनी हा दौरा तुर्तास स्थगित केला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या पायावर पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

 

Share